मागील आठवड्यामध्ये अमेरिकन हवाई दलाने सीरियामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये अल-कायदाचे सात वरिष्ठ नेत्यांना ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अल कायदाचे नेते इदबिलजवळ एका बैठकीसाठी भेटलेले असतानाच हल्ला करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यामध्ये संघटनेचे ५० हून अधिक सदस्य ठार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर बेथ रिऑर्डन यांनी दिल्ल्या माहितीनुसार अमेरिकेने २२ ऑक्टोबर रोजी हा हवाई हल्ला केला. मात्र या हल्ल्यामध्ये अल-कायदाचे नक्की कोणते नेते मारले गेले त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नसल्याचे असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अल-कायदाच्या बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आल्याने या दहशतवादी संघटनेच्या नियोजनाची आणि जगभरामध्ये हल्ले करण्याची शक्ती नक्कीच कमी झाली आहे, असंही रिऑर्डन यांनी स्पष्ट केलं. “अल-कायदा वायव्य सीरियामधील अस्थिरतेचा फायदा घेत दहशतवादी कारवाया करण्यासाठी येथे तळ निर्माण करुन डावपेच आखतात. त्यामुळेच आम्ही आमचे सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही अल-कायदा आणि अन्य दहशतवादी संघटनांवर हल्ले करत राहणार आहोत,” असं रिऑर्डन यांनी सांगितलं.

टुर्कीचे समर्थन असणाऱ्या विरोधी पक्षाचे प्रवक्ते युसूफ हमूद यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी करण्यात आलेले हवाई हल्ले हे रशियाच्या पाठिंब्याने करण्यात आले आहेत. रशियाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. इदबिलमधील फैलाक अल शामद्वारे चालवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती हमूद यांनी दिली आहे. फैलाक अल शाम हा विरोधकांच्या मोठ्या संघटनांपैकी एक आहे. टर्की मागील बऱ्याच काळापासून सीरियामधील विरोधी गटांना समर्थन देत आहेत. याच संघटनेतील तरुणांचा टुर्कीने लीबिया आणि आजरबैजानमध्ये वापर केला आहे. सीरियामधील युद्धावर लक्ष ठेऊन असणारे ब्रिटनमधील सीरियन ऑब्झरव्हेट्री फॉर ह्यूमन राइट्सने या हल्लामध्ये ७८ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. तर एकूण ९० जण जखमी झाले आहेत. हवाई हल्ला करण्यात आलेल्या प्रदेशामध्ये मदतकार्य सुरु आहे. रशियाने हा हल्ला केल्याची शक्यता अल-कायदानेही व्यक्त केली आहे. रशिया सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचा समर्थक आहे.

दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने तैवानला २.३७ अरब डॉलर्समध्ये हार्पून मिसाईल तंत्रज्ञान विकण्यासंदर्भातील माहिती सोमवारी जारी केली आहे. त्यानंतर काही तासांमध्येच चीनने बोईंगबरोबरच अमेरिकन सुरक्षा कंपन्यांवर निर्बंध घालण्याची घोषणा केली. हार्पून व्यवहारामध्ये बोईंग मुख्य ठेकेदार कंपनी आहे. तैवानमध्ये शांतता असणे हे सर्वांना दृष्टीने फायद्याचे आहे. सुरक्षित आणि शांत तैवान ही अमेरिकेच्याही हिताची गोष्ट आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागरामध्ये सुरक्षा आणि शांतता टीकून राहणे अमेरिकेला महत्वाचं वाटतं, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.