विविध व्यावसायिकांचे १२.५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातींमधील (यूएई)मूळ भारतीय वंशांच्या व्यापारी आणि उद्योगपतींनी १२.५ कोटी रुपये मदतीचे आश्वासन दिले आहे. केरळमध्ये ८ ऑगस्टपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत साधारण २०० जणांचे प्राण गेले असून ३.१४ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांनी १५ हजार नागरिकांना वाचवले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. राज्यातील सर्व नद्यांना पूर आला असून ८० धरणांतील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. राज्यातील गेल्या १०० वर्षांतील ही सर्वात गंभीर पूर परिस्थिती असल्याचे मानले जात आहे. या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी सैन्य दले, बचाव पथके, विविध सेवाभावी संस्था मदतकार्य करत असून आता परदेशांतील भारतीयांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संयुक्त अरब अमिरातींमधील उद्योगपती आणि व्यावसायिकांनी सुमारे १२.५ कोटी रुपयांच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंबंधीचे वृत्त खलीज टाइम्सने दिले आहे. संयुक्त अरब अमिरातींमध्ये २६ लाख भारतीय असून देशाच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण ३० टक्के आहे. त्यातील अनेकांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत देऊ केली आहे. केरळमध्ये जन्म झालेले पण संयुक्त अरब अमिरातींमध्ये वास्तव्यास असलेले लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक युसूफ अली एमए यांनी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. फातिमा हेल्दकेअर समूहाचे अध्यक्ष के. पी. हुसेन यांनी ५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यापैकी १ कोटी रुपये थेट केरळच्या मुख्यमंत्री निधीत जमा होतील, तर उर्वरित रक्कम वैद्यकीय मदतीसाठी खर्च केली जाईल. हुसेन यांनी सांगितले की, त्यांच्या उद्योगसमूहाने वैद्यकीय मदत पथके पाठवण्यासाठी केरळच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली आहे. युनीमोनी अँड यूएई एक्स्चेंजचे अध्यक्ष बी. आर. शेट्टी यांनी २ कोटी रुपये मदतीचे आश्वासन दिले आहे. अॅस्टर डीएम हेल्दकेअरचे अध्यक्ष आझाद मुपेन यांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच या समूहाने ३०० स्वयंसेवकांचे वैद्यकीय मदत पथक पाठवण्याची तयारी केली आहे. यासह संयुक्त अरब अमिरातींचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांनी केरळला मदत करण्यासाठी आपत्कालीन समिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.