गुरुग्राम पोलिसांनी मंगळवारी चार उबर चालकांना अटक केली आहे. 15 प्रवाशांची लूट केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस हायवेवर उबर चालकांनी प्रवाशांना लुटलं होतं. एका पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी कॅब चालवत असे आणि इतर तिघेजण प्रवासी असल्याचं नाटक करत असतं. खासकरुन जवळचं अंतर असणाऱ्या प्रवाशांना टार्गेट केलं जात असे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी उबरसाठी काम करत होते. आरोपींनी गेल्या तीन महिन्यात 15 जणांना लुटलं आहे. चाकूचा किंवा बंदुकीचा धाक दाखवत प्रवाशांची लूट केली जात असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी हरियाणा, मेवाड आणि पलवालचे रहिवासी आहेत. आरोपींनी आपण बंदुकीचा धाक दाखवत 15 प्रवाशांकडून रोख रक्कम, एटीम कार्ड्स आणि मोबाइल फोन चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन कार ताब्यात घेतल्या आहेत.