मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मात्र त्याचवेळी त्यांनी अगदी राज्यातील प्रश्नांपासून ते केंद्र सरकारवरही आपल्या खास शैलीमध्ये टिका केली. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेल्या शिवथाळीच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी किमान आम्ही पाच रुपयात भरलेली थाळी तरी दिली. रिकाम्या थाळ्या वाजवण्यापेक्षा ते बरं आहे, असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांना आपल्या घराच्या खिडक्यांमध्ये, बाल्कन्यांमध्ये थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यावरुनच उद्धव यांनी हा टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री भाषण देण्यासाठी उभे राहिले असता त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये कोणी काय मुद्दे मांडले यासंदर्भात भाष्य केलं. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहामध्ये प्रवेश केला. यावर मुनगंटीवार यांची फिरकी घेत, तुम्ही ज्या आवेषाने बोलत होता ते पाहून फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याचा चिमटा मुख्यमंत्रांनी काढला. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “सुधीरभाऊ तुम्ही पाच रुपयामध्ये थाळी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे तुम्ही खाणार का, आम्ही खाणार का यासंदर्भातील अनेक प्रश्न तुम्ही विचारले,” असं म्हणत शिवथाळी योजनेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर दिलं. “मी नुकतचं राष्ट्रपतींचं भाषण पाहिलं. राष्ट्रपतींनी दिलेल्या माहितीमध्ये करोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये ८० कोटी लोकांना अतिरिक्त पाच किलो धान्य मोफत दिल्याचा उल्लेख आहे. आठ महिन्यानंतर हे सर्व गरीब श्रीमंत झाले का? आठ महिने त्यांना पाच किलो लागले आणि नंतर ते श्रीमंत झाले असं झालं का? मग इंधन वाढलं तरी चालेल, गॅस वाढला तरी चालेल पण गरीबाने गरीब राहता कामा नये. त्यांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे. गरिबाची कुवत वाढली पाहिजे म्हणून आम्ही इंधनाची दरवाढ करतोय. गॅसची दरवाढ करतोय. या गरिबाला सुद्धा कमवून घरच्या घरी अन्नधान्य शिजवता आलं पाहिजे,” असं उद्धव म्हणाले.

“आहो सुधीरभाऊ, एक गोष्ट मी नम्रपणाने सांगतो, आम्ही पाच रुपयामध्ये शिवभोजन थाळी देतोय. पाच रुपयामध्ये गरिबाचं पोट भरतोय. भरलेली थाळी देतोय. रिकामी थाळी देत नाही वाजवून करोना घालवायला. काय सांगितलं होतं की आठ बजे थाली बजाओ. निदान त्या थाळीचा उपयोग आवाज काढायला आहे, ऐवढं तरी गरिबाला कळलं. भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा या सरकारमधला फरक आहे. तुम्ही गरिबालाच विचारा तुला भरलेली थाळी हवीय की वाजवायला?,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray defends shivbhojan thali by comparing it with banging of thali for corona as said by modi scsg
First published on: 03-03-2021 at 16:55 IST