शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि अडवाणी यांच्यातील भेटीला विशेष महत्त्व आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास शिवसेनेने काही दिवसांपूर्वी आक्षेप नोंदविला होता. त्यापार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट झाली. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे अनेक चेहरे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितले.
‘असोचेम’ या उद्योजकांच्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. यूपीए सरकारला परत पाठविण्याची वेळ आली असून, पुढील वर्षी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी उद्योजकांशी संवाद साधताना व्यक्त केला.
उद्धव ठाकरे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे.