पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे हा नेहमीच अनेकांच्या टीकेचा विषय राहिलेला आहे. सध्यादेखील नरेंद्र मोदी अमेरिकेत असून यानंतरचा त्यांचा मुक्काम मेक्सिकोत असेल. अमेरिकेत येण्यापूर्वी मोदींनी अफगाणिस्तान, कतार आणि स्वित्झर्लंड या देशांना भेट दिली होती. मोदींच्या या परदेश दौऱ्यांच्या अतिरेकामुळे ते सध्या ट्विटरकरांच्या टीकेचे आणि थट्टेचा विषय ठरत आहेत. मोदींच्या या परदेशगमनाविषयी सध्या ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून त्यामुळे #UdtaPM हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्विकारल्यापासून आत्तापर्यंत ४२ देशांना भेटी दिल्या आहेत.

सेन्सॉर बोर्डाने सोमवारी ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील पंजाब हा शब्द वगळण्यास सांगितले होते. त्यामुळे काल दिवसभरात सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर टीका सुरू होती आणि त्यामुळे ट्विटरवर #UdtaPunjab हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. मात्र, आज ट्विटरकरांनी सर्जनशीलपणे सेन्सॉर बोर्डाची सूचना अंमलात आणत असून Punjab हा शब्द वगळून त्याजागी PM हा शब्द लिहत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.