कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात इतिहासात प्रथमच रमझानचा रोझा सोडण्यासाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले. मंदिरातील अन्नपूर्ण भोजनगृहात मुस्लिमांना रमझाननिमित्त खास इफ्तारची दावत देण्यात आली. या ऐतिहासिक इफ्तार दावतला १५० हून अधिक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना सफरचंद, केळी आणि कलिंगड यासारखी फळे वाढण्यात आली. यासोबत उपस्थितांना काजू आणि काळी मिरीच्या सहाय्याने तयार करण्यात काश्यदेखील देण्यात आले. विशेष म्हणजे विश्वेशा तीर्थ स्वामी यांनी स्वत: मुस्लिम बांधवांना खजुरांचे वाटप केले. यावेळी स्वामींनी विविध जाती-धर्मातील लोकांना सलोख्याने राहण्याचे आवाहन केले.

‘सर्व धर्मांमधील लोकांनी सहिष्णूता जपायला हवी. यासोबतच एकमेकांसोबत सलोख्याने राहायला हवे. मंगळुरु, कासरागोड आणि भटकळ भागातील मुस्लिमांना मला खूप प्रेम दिले आहे. परयारा सणादरम्यान मला त्यांचे चांगले सहकार्य मिळाले,’ असे विश्व हिंदू परिषदेशी जवळीक असलेल्या सीर यांनी इफ्तारवेळी सांगितले. कर्नाटकच्या किनारी भागातील लोकांनी सौहार्दाने राहून संपूर्ण कर्नाटक राज्यासमोर आदर्श ठेवावा, असे आव्हानदेखील त्यांनी केले. ‘आपण सगळे एकाच निर्मात्याची निर्मिती आहोत,’ यावरही त्यांनी भर दिला.

श्रीकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक इफ्तार दावत कार्यक्रमाला अंजुमन मशिदीचे इमाम मौलाना इन्नायातुल्लाहदेखील उपस्थित होते. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील भोजनगृहात इफ्तार दावतचा कार्यक्रम साजरा झाला. रोझा सोडल्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाजदेखील अदा केला. यावेळी अंजुमन मशिदीचे एम. ए. गफूर यांनी सर्वांना शांततेचा संदेश दिला. विशेष म्हणजे उडुपी या बोलीभाषेत गफूर यांनी उपस्थितांना एकतेचे आवाहन केले. ‘मंदिरात रोझा सोडण्याचा आणि नमाज अदा करण्याचा निर्णय हा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे समाजातील सलोखा टिकवण्यास मोठी मदत होईल,’ असे गफूर यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मंदिर प्रशासनाचे आभारदेखील मानले.