विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना २९ सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत.

या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवण्यात यावीत, असेही युजीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना गुरुवारी पत्र पाठवले असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना २९ सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्यास सांगण्यात आले आहे. परेडनंतर एनसीसीचे कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधित करतील.

युजीसीच्या पत्रात म्हटले आहे की, दिल्लीतील राजपथावरील इंडिया गेटजवळ २९ सप्टेंबर रोजी एक दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्ये, केंद्रशासित प्रदेश, महत्वाची शहरे, देशातील लष्करी छावण्यांमध्ये देखील प्रदर्शने भरवली जातील. ही प्रदर्शने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी असावीत असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते. विशेष दलाच्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते.