19 February 2019

News Flash

आधार सॉफ्टवेअर हॅकिंगचे वृत्त दिशाभूल करणारे: UIDAI चे स्पष्टीकरण

काहीजण वैयक्तिक हितासाठी जाणूनबुजून लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पूर्णपणे अनुचित आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

सॉफ्टवेअर हॅक झाल्याचे वृत्त भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) फेटाळले आहे. यूआयडीएआयने मंगळवारी निवेदन जारी करून सोशल आणि ऑनलाइन माध्यमांत आलेले आधार एनरॉलमेंट सॉफ्टवेअर कथितरित्या हॅक झाल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. डेटाबेसमध्ये घुसखोरी करणे अशक्य असून हॅकिंगचा दावा आधारहीन असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

तीन महिन्यांच्या दीर्घकालीन तपासानंतर माध्यमांत आलेल्या एका अहवालात आधार डेटाबेसच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करता येत असल्याचा दावा करण्यात आला होता. पॅचच्या माध्यमातून आधारच्या सुरक्षिततेचा पर्याय बंद केला जाऊ शकतो. ‘हफपोस्ट इंडिया’च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोणताही व्यक्ती केवळ २५०० रूपयात सहज मिळणाऱ्या या पॅचच्या माध्यमातून जगातून कोठूनही आधार आयडी तयार करू शकतो.

त्यानंतर यूआयडीएआयने म्हटले की, काहीजण वैयक्तिक हितासाठी जाणूनबुजून लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पूर्णपणे अनुचित आहे. प्राधिकरणाच्या मते, आधार जारी करण्यापूर्वी यूआयडीएआय व्यक्तीच्या सर्व बायोमॅट्रिकची पडताळणी आधार होल्डर्सच्या बायोमॅट्रिक्सशी करते.

जोपर्यंत संबंधित व्यक्ती स्वत: आपला बायोमॅट्रिक देत नाही. कोणताही ऑपरेटर आधार बनवू शकत नाही किंवा अपडेटही करू शकत नाही. बायोमॅट्रिक्स प्रमाणित झाल्यानंतरच नवीन आधार किंवा त्यात अपडेट करता येते. अशात सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी शक्य नसल्याचे यूएआयडीने म्हटले आहे.

First Published on September 11, 2018 9:06 pm

Web Title: uidai dismisses a news report appearing in social and online media about aadhaar enrolment software being allegedly hacked