ब्रिटनमधील न्यायालयाची भारत सरकारला विचारणा
लंडन : ब्रिटनच्या एका न्यायालयाने फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या रिमांडबाबत पुढील सुनावणीसाठी २७ जून ही तारीख निश्चित केली, तसेच नीरवला भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यास त्याला कोणत्या तुरुंगात ठेवले जाईल, याची १४ दिवसांच्या आत निश्चित माहिती देण्याचे निर्देश भारत सरकारला दिले.
सुमारे २ अब्ज अमेरिकी डॉलरचा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भारतात हव्या असलेल्या नीरवला वेस्टमिन्स्टर न्यायालयात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे सुनावणीसाठी हजर करण्यात आले.
न्यायाधीशांनी नीरवच्या रिमांडच्या व्हिडीओ लिंकमार्फत सुनावणीची पुढील तारीख २७ जून ही निश्चित केली आणि त्याच्या तुरुंग कालावधीच्या निश्चितीसाठी भारतीय अधिकाऱ्यांना १४ दिवसांची मुदत दिली, त्याची नीरव मोदीने दखल घेतली.
तुरुंगवासाबाबतच्या विचारणेला १४ दिवसांत उत्तर न मिळण्याचे काहीच कारण नाही आणि आर्थर रोड कारागृह हा स्पष्ट पर्याय असू शकतो, असे अर्बुथनॉट म्हणाल्या.
डिसेंबर २०१८ मध्ये मद्यसम्राट विजय मल्या याच्या प्रत्यार्पणाचा आदेश देणाऱ्या अर्बुथनॉट यांनी मल्या याला ज्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे, त्याचा व्हिडीओ मागवला होता. मोदी याला त्याच कारागृहात ठेवण्यात येणार असेल, तर बहुधा न्यायालयाला त्यावर काही आक्षेप असणार नाही, असे संकेत यातून मिळाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2019 3:42 am