ब्रिटनमध्ये ७ मे २०१५ रोजी
संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या (हाऊस ऑफ कॉमन्स) ६५० जागांसाठी मतदान होत आहे.  त्याबरोबर काही भाग वगळता देशभरात स्थानिक पातळीवरील निवडणुकाही होत आहेत. जगभरातील नागरिकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. त्यानिमित्ताने या निवडणुकीच्या महत्त्वाच्या विषयांचा घेतलेला वेध..

कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह (हुजूर)
हा सध्याचा सत्ताधारी पक्ष असून त्याचे नेते डेव्हिड कॅमेरून सध्याचे पंतप्रधान आहेत. या वेळी हा पक्ष ६५० पैकी ६४७ जागा लढवत आहे. उत्तर आर्यलडमधील दोन जागा आणि सभापतीची (स्पीकर) जागा यासाठी त्यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत.

लेबर (मजूर)
नेते एड मिलिबँड हा पक्ष १९९७ ते २०१० या काळात सत्तेवर होता. २०१० सालच्या निवडणुकीनंतर २५८ जागा मिळवून तो प्रमुख विरोधी पक्ष आहे. सध्या त्यांनी ६३१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. स्पीकरची जागा ते लढवत नाही आहेत.

लिबरल डेमोक्रॅट्स
नेते निक क्लेग.  सध्याच्या सरकारमध्ये हुजूर पक्षाबरोबर त्यांची युती असून क्लेग उपपंतप्रधान आहेत. ते ६३१ जागा लढवत आहेत. अल्पउत्पन्न गटासाठी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवणे हे या पक्षाचे एक महत्त्वाचे धोरण आहे.

पक्षाची ध्येयधोरणे
हुजूर ..विविध समाजघटकांचे सबलीकरण आणि नोकरशाहीचा आकार कमी करणे या तत्त्वांवर आधारित सुधारणांचा कार्यक्रम त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रिटनची घसरत चाललेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी काही बाबींना त्यांना तिलांजली द्यावी लागली.

मजूर..गरीब-श्रीमंतांमधील वाढत चाललेली दरी कमी करणे, गेल्या सरकारच्या काळात दुर्लक्षिला गेलेला राहणीमानावरचा वाढता खर्च (कॉस्ट ऑफ लिव्हिंग) कमी करणे अशी त्यांची धोरणे आहेत.

लिबरल डेमोक्रॅट्स.. कामावर जाणाऱ्या पालकांसाठी मुलांच्या संगोपनाची मोफत व्यवस्था करणे, नवी रोजगारनिर्मिती, कामगारांसाठी करात कपात करणे अशी या पक्षाची साधारण धोरणे आहेत.

मतदान कशासाठी- ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी (हाऊस ऑफ कॉमन्स). वरिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतात. भारतातील लोकसभा आणि राज्यसभेसारखा हा प्रकार आहे. आपल्याकडील राष्ट्रपतीऐवजी तेथे महाराणी राज्याची प्रमुख असते. मतदानाची आणि खासदार निवडीची, तसेच सरकार स्थापनेची पद्धत बहुतांशी भारतासारखीच आहे.

एकूण जागा – ६५० (बहुमत – ३२६)
* ब्रिटनमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आर्यलड हे प्रमुख प्रांत आहेत. देशाच्या एकूण ६५० मतदारसंघांपैकी ५३३ इंग्लंडमध्ये, ५९ स्कॉटलंडमध्ये, ४० वेल्समध्ये तर १८ उत्तर आर्यलडमध्ये आहेत.
* बहुमतासाठी आवश्यक सदस्य संख्या – ३२६
* ३० मार्च २०१५ रोजी ५५वे सभागृह विसर्जित झाले.
* मतदानाची तारीख – ७ मे २०१५ (सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत)  
* मतमोजणी – मतदान संपल्यानंतर लगेचच सुरू होईल आणि ८ मे रोजी संपण्याची अपेक्षा
* नवनिर्वाचित खासदार संसदेत जमण्याची आणि सभापती निवडीची संभाव्य तारीख – १८ मे २०१५
* ५६ व्या सभागृहाचे उद्घाटन आणि राणीचे अभिभाषण- २७ मे (संभाव्य तारीख)

भारतीय स्थलांतरितांची भूमिका..
ब्रिटनमध्ये असलेल्या परदेशी स्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटनमधील एकूण मतदारांची संख्या ४५ दशलक्षांच्या आसपास आहे. त्यांपैकी अंदाजे ६,१५,००० मतदार भारतातून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले नागरिक आहेत. यामध्ये भारतीय स्थलांतरितांच्या ब्रिटनमध्ये जन्मलेल्या मुलांचा समावेश नाही. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार ब्रिटनमध्ये सुमारे १.४ दशलक्ष भारतीय वंशाचे नागरिक राहतात. सर्वच पक्ष भारतीयांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अजमावत आहेत. अनेक पक्षांनी यातील काही व्यक्तींना उमेदवारीही दिली आहे.

जनमत चाचण्या ..  हुजूर व मजूर पक्षात चुरशीची लढत होऊन मजूर पक्षाला थोडय़ा जास्त जागा मिळतील. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. लिबरल डेमोकॅट्र्सच्या जागा वाढून सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल.

यंदाच्या निवडणुकीतील मुद्दे..
यंदाची निवडणूक ब्रिटनची आर्थिक परिस्थिती, स्थलांतरितांचा प्रश्न, युरोपीय महासंघाचे सदस्यत्व आणि देशातील आरोग्य सेवेतील सुधारणा या महत्त्वाच्या मुद्दय़ांभोवती फिरेल.
ल्लअर्थकारण.. ब्रिटनच्या अर्थसंकल्पात सध्या ९० अब्ज पौंडची  तूट आहे. सर्व महत्त्वाचे पक्ष ती कमी करण्यावर भर देत आहेत.
ल्लयुरोपीय महासंघाचे सदस्यत्व.. या निवडणुकीनंतर ब्रिटन युरोपीय महासंघाचा सदस्य राहणार की नाही याबाबत निर्णय होऊ शकतो. निवडून आलो तर आपण ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे की नाही या विषयावर २०१७ पर्यंत सार्वमत घेऊ, असे हुजूर पक्षाने जाहीर केले आहे. सदस्यत्वाच्या करारात बदल केल्यास आपण सार्वमताला पाठिंबा देऊ असे लिबरल डेमोकॅट्र्स पक्षाने म्हटले आहे. मात्र ते सार्वमताच्या विरोधात आहेत.