करोनाच्या नियमांचं उल्लंघन करत आपल्या सहकाऱ्याला मिठी मारुन किस घेणाऱ्या ब्रिटनच्या आरोग्य सचिवांना राजीनामा द्यावा लागला आहे. सहकाऱ्याचं चुंबन घेताना पकडल्यानंतर आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

द सन या वृत्तपत्राने मॅट हँकॉक आपल्या कार्यालयात महिलेला मिठी मारताना आणि चुंबन घेतानाचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, विवाहित मॅट हँकॉक यांनी आपल्या कार्यालयाच्या कामगिरीची माहिती ठेवण्यासाठी या महिलेची नियुक्ती केली होती.

द सनच्या वृत्तानुसार, हे फोटो मे महिन्यातील आहेत जेव्हा ब्रिटनमध्ये करोनामुळे नियम कडक करण्यात आले होते. नागरिकांना घऱाबाहेर कोणाच्याही अत्यंत जवळ संपर्कात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं.

ब्रिटन सरकारच्या करोनाविरोधातील लढाईत मॅट हँकॉक महत्वाची भूमिका निभावत नेहमी पुढे होते. विशेष म्हणजे अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांनी करोनाविरोधातील लढाईत नागरिकांना सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

मॅट हँकॉक यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे. नियमाचं उल्लंघन करत आपण करोनाविरोधात लढ्यात आपलं खूप काही गमावणाऱ्यांना आम्ही देणं लागतो असंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा स्वीकारताना तुम्ही दिलेल्या सेवेसाठी अभिमान बाळगा अशी प्रतिक्रिया दिली आहे.