एअर इंडियाचे काही कर्मचारी त्यांच्यासोबत आणलेल्या डब्यांमधून जेवण घेऊन गेले, असा आरोप लंडनच्या एका हॉटेलने केला आहे. यानंतर एअर इंडियाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे. ‘बफेट जेवण घेऊन जाण्यासाठी नाही,’ अशी आशयाची एक नोटीसच फ्लाईट सर्विस डिपार्टमेंटच्या सहाय्यक व्यवस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे.

‘एअर इंडियाचे काही कर्मचारी बफेटमध्ये ठेवण्यात आलेले पदार्थ त्यांच्याकडे असणाऱ्या रिकाम्या डब्यांमध्ये भरुन घेऊन जात होते, असे पत्र लंडनमधील एका हॉटेलकडून मिळाले आहे. अशा प्रकारची कृती करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल. कदाचित हे कृत्य खूप कमी लोकांकडून झाले असेल. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चालणार नाही. कारण अशा लोकांमुळे एअर इंडियाचे नाव बदनाम होते. त्यामुळे अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत,’ अशा आशयाचे पत्र एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी मात्र सहाय्यक व्यवस्थापकांनी पाठवलेले पत्र बोगस असल्याचे म्हटले आहे. सहाय्यक व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचे पत्र पाठवण्याचा अधिकार नसल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. मात्र एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कारवाईचा इशारा देणारे पत्र मिळाल्याचे सांगितले आहे.

‘रिकाम्या डब्यांमध्ये हॉटेलमधील जेवण भरुन नेण्याचे कृत्य केबिन क्रूसोबतच इतर विभागांमधील कर्मचारीदेखील करतात,’ अशी प्रतिक्रिया एअर इंडियाच्या एका वरिष्ठ केबिन क्रूने एका वर्तमानपत्रासोबत बोलताना दिली आहे. ‘बफेटमधील जेवण डब्यात भरुन घेऊन जाणे, हे वाईट आणि निंदनीय आहे. मात्र विमानाच्या वेळा आणि त्या दरम्यान मिळणारा अपुरा वेळ यांच्यामुळे असे कृत्य होत असावे. आम्ही सकाळी ७.३० किंवा संध्याकाळी ६.३० वाजता लंडनला पोहोचतो. घरातून निघाल्यानंतर साधारणत: १४ ते १५ तासांनंतर आम्ही लंडनला पोहोचतो. त्यामुळे आम्ही अत्यंत दमलेलो असतो. पूर्वी आम्हाला लंडनमध्ये दोन दिवस मिळायचे. मात्र आता फक्त २६ तास मिळतात. या २६ तासांमध्येच आम्हाला झोपावे लागते आणि विमानदेखील पकडायचे असते. त्यामुळेच काही कर्मचारी खाण्याच्या डब्यांमध्ये जेवण घेऊन जातात. मात्र सगळे कर्मचारी करत नाहीत,’ असे एका केबिन क्रूने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले आहे.