ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या गुरजीत सिंह लाल नावच्या वय्क्तील एका खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये आरोपीला १४ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मागील वर्षी २४ ऑगस्ट रोजी गुरजीत सिंह लाल आणि एका व्यक्तींमध्ये साऊथ हॉल येथील एका रस्त्यावर वाद झाला. माजी रग्बीपटू आणि बॉडी बिल्डर असणाऱ्या एलन आयजिचे आणि गुरजीत सिंहमधील शाब्दिक बाचाबाचीला हिंसक वळण मिळालं आणि त्यामध्येच रागाच्या भरात गुरजीतने एलनवर चाकूने हल्ला केला.

लंडन पोलिसांच्या स्कॉटलॅण्ड यार्डने दिलेल्या माहितीनुसार एलन संध्याकाळी सहाच्या आसपास एका स्थानिक क्लबमध्ये गेला होता. त्यानंतर तो सायंकाळी साडेसहानंतर तिथून सेंट मॅरी एव्हिन्यू साऊथ येथील घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी वाटेत त्याला गुरजीत रस्त्यावर थुंकताना दिसला. यावरुन एलनने गुरजीतला हटकले. यावरुनच त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. गुरजीतने एलनला जाण्यास सांगितलं. एलन तिथून निघून जाण्यासाठी वळला असता गुरजीत पुन्हा थुंकला आणि त्यावरुन त्यांच्यामध्ये झटापटी झाली. तेव्हा गुरजीतने त्याच्याकडील चाकूने एलनवर हल्ला केला. गुरजीतने एलनवर चाकूने वार केले आणि तिथून पळ काढला.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच एलनने जवळच असणाऱ्या एका घराच्या दारावरील बेल वाजवून मदत मागितली. थोड्याच वेळात पोलीस आणि रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. मात्र रुग्णालयामध्ये पोहचण्याआधी एलनचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्यावर प्रथमोपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रात्री आठ वाजता एलनला मृत घोषित केलं, असं डेली मेलच्या वृत्तात म्हटलं आहे.
एलन आणि गुरजीतदरम्यान झालेल्या झटापटीमध्ये गुरजीतलाही जखमा झाल्याने त्याने तिथून पळ काढला.

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून तपास करत गुरजीतला ताब्यात घेतले. आपण स्वत:च्या संरक्षणासाठी हल्ला केल्याची माहिती गुरजीतने दिली. मात्र तू चाकू घेऊन का फिरत होता यासंदर्भातील प्रश्नाला गुरजीतने योग्य उत्तर दिलं नाही. तसेच एलनपासून जीवाला नक्की काय धोका होता यासंदर्भातही गुरजीतला समाधानकारक उत्तर देता आलं नाही असं पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितलं.