आपल्या शेजारील घरात घुसून त्याने मौल्यवान वस्तू चोरल्या, मात्र प्रचंड झोप आल्यामुळे काही वेळ तेथेच झोपण्याचा निर्णय घेतला. मात्र याच झोपेने त्याचा घात केला आणि अलगद तो पोलिसांच्या तावडीत सापडल्याची घटना ब्रिटनमध्ये उघडकीस आली आहे.पश्चिम वॉर्कशायर येथील लीड्स भागात राहणाऱ्या फ्रँकी फ्लॅनिगन असे या चोराचे नाव आहे. फ्रँकी याने आपल्या आईच्या घराशेजारी असणाऱ्या घरात कोणी नसल्याचे पाहून आत प्रवेश केला. त्यानंतर टीव्ही, लॅपटॉप तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरल्या आणि त्या बाहेर आणून ठेवल्या. मात्र त्याला प्रचंड झोप आल्यामुळे तो त्याच घरात थोडा वेळ झोपला. मात्र संध्याकाळपर्यंत त्याला जागच आली नाही. त्यामुळे जेव्हा त्या घराची मालकीण संध्याकाळी परतली. तेव्हा फ्रँकी घरात झोपलेला आढळला. तसेच खिडक्यांच्या काचा फुटण्याबरोबरच काही सामानही नाहीसे झाल्याचे तिला आढळून आले. त्यामुळे तिने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्रँकीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर फ्रँकीविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयाने त्याला १८ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.