दिवाळी, ईद यांसारख्या सणांच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली तर सार्वजनिक सुट्टय़ांमध्ये आणखी भर पडून देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, असे कारण देत या सणांना राष्ट्रीय सुट्टय़ांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव ब्रिटन सरकारने फेटाळून लावला आहे.
यासंबंधीची विनंती करणारी ऑनलाइन सूचना सरकारला करण्यात आली होती आणि त्यावर एक लाख २१ हजार ८४३ जणांनी आपल्या स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. संबंधित विभागाने याबद्दलचा निर्णय जाहीर केला. दिवाळी, ईद हे सण ब्रिटनमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जात असल्यामुळे या सणांचे महत्त्व आम्हाला चांगले ठाऊक आहे. लोकांना एकत्र आणण्याकामी सरकार बांधील असून अशा सणांद्वारे त्यांनी एकत्र यावे, म्हणून आम्ही लोकांना प्रोत्साहन व पाठिंबाही देतो.
आमचे हे उद्दिष्ट दिवाळी व ईदसारखे सण पूर्ण करतात. परंतु हे सण साजरे करण्यासाठी या सणांना राष्ट्रीय वा बँकेच्या सुट्टीचा दर्जा देता येत नाही, याचा खेद वाटतो, असे हाऊस ऑफ कॉमन्सच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.