भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रिटीशांनी बुधवारी १२ व्या शतकातील चोरीला गेलेली ब्राँझची बुद्ध मूर्ती समारंभपूर्वक भारताला परत केली. १९६१ साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून ही ब्राँझची बुद्ध मूर्ती चोरीला गेली होती. आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांनी ही मूर्ती समारंभपूर्वक भारताला परत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६१ साली नालंदा येथील संग्रहालयातून एकूण १४ मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीचा समावेश होता. ही मूर्ती लंडनमधल्या लिलावात पोहोचण्याआधी अनेक देशांमध्ये फिरली. ही मूर्ती विकत घेणाऱ्या मालकाला बुद्ध मूर्ती भारतातून चोरलेली असल्याची कल्पना दिल्यानंतर त्याने मूर्ती भारताला परत करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखवली असे लंडन पोलिसांनी सांगितले.

कलेच्या चोरी विरोधात काम करणारी संस्था एआरसीए आणि इंडिया प्राईड प्रोजेक्टचे विजय कुमार यांनी यावर्षी मार्च महिन्यात व्यापार मेळयात मूर्तीची ओळख पटवली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सतर्क केले. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लंडन इंडिया हाऊस येथे लंडन पोलिसांनी इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त वाय.के.सिन्हा यांना ही बुद्ध मूर्ती सुपूर्द केली.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk returns indian buddha statue stolen in 1961 from bihar nalanda
First published on: 15-08-2018 at 18:03 IST