करोना विषाणू महामारी ही समलैगिक विवाहावरील इश्वराची शिक्षा आहे असं सांगणाऱ्या युक्रेनमधील चर्चच्या प्रमुखांना करोनाची बाधा झाली आहे. युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रियाच फिलारेट यांची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल सकारात्मक आले. त्यानंतर त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी एका फेसबुक पोस्टद्वाके देण्यात आलेल्या माहितीत त्यांची प्रकृती आता ठिक असल्याचं सांगण्यात आलं.

“चर्च प्रमुखांनी आपले शुभचिंतक आणि समर्थकांना आपल्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. त्यांची प्रकृती आता ठिक आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. देव लवकरच त्यांना या आजारातून बाहेर काढेल अशी आम्ही अपेक्षा करतो,” असं चर्चकडून सांगण्यात आलं.

९१ वर्षीय पॅट्रियाच फिलारेट मार्च महिन्यात अचानक चर्चेत आले होते. युक्रेनियन टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांना मुलाखतीदरम्यान करोना महामारीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. “माणसाच्या गुन्ह्यांच्या विरोधात ईश्वरानं दिलेली ही शिक्षा आहे,” असं ते म्हणाले होते. तसंच या महामारीसाठी समलैगिक विवाहाला जबाबदार असल्याचं ते म्हणाले होते.

युक्रेनमधील समलैगिक विवाहाविरोधात चर्च प्रमुखांनी मोर्चा वळवला होता. दरम्यान, युक्रेनमधील नाराज असलेल्या समलैगिक समुदायानं त्यांच्याविरोधात खटलाही दाखल केला होता. तसंच यामध्ये त्यांनी चर्च प्रमुखांचं वक्तव्य द्वेष आणि भेदभाव पसरवणारं असल्याचं म्हटलं होतं. समलैगिक समुदायाकडून चर्च प्रमुखांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली होती. न्यायालयीन लढाईदरम्यान चर्चनं चर्च प्रमुखांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. “चर्च प्रमुख आणि एक व्यक्ती म्हणून त्यांना आपलं म्हणणं मांडायचं स्वातंत्र्य आहे आणि त्यांचं वक्तव्य नैतिकतेवर आधारित होतं,” असं चर्चकडून सांगण्यात आलं होतं.