भारतात होणाऱ्या मॉब लिचिंगच्या घटना निषेधार्ह आहेत. याप्रकरणी ब्रिटिश सरकारने लक्ष घालावं अशी मागणी द लेबर पार्टीने केली आहे. लेबर पार्टीचे खासदार जोनाथन एशवर्थ यांनी भारतातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करणारं एक पत्र ब्रिटन सरकार आणि देशाचे परराष्ट्र सचिव यांना लिहिलं आहे. भारत सरकार मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आता ब्रिटन सरकारने लक्ष घालावं अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतात घडणाऱ्या य़ा घटना लाजिरवाण्या आहेत असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

भारतात मुस्लीम समाजातल्या लोकांवर होणारे हल्ले आणि मॉब लिचिंगसारख्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. या घटनांमधून मुस्लीम समाजाच्या लोकांवर हल्ले केले जातात. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो, गंभीर मारहाण करण्यात येते या सर्व बाबी चिंताजनक आहेत. क्षुल्लक कारणांवरुन दंगली उसळणे, भेदाभेद होणे, तोडफोड केली जाणे या घटनाही यासोबत घडत आहेत. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता या घटना रोखण्यासंदर्भात ब्रिटन सरकारने लक्ष घालावे आणि मोदी सरकारला याबाबत सल्ला द्यावा अशी मागणी लंडन येथील लेबर पार्टीचे खासदार जॉनसन अशवर्थ यांनी केली आहे.

जून महिन्यात झारखंडमध्ये एका मुस्लीम तरुणाला बाईक चोरीच्या संशयावरुन झाडाला बांधण्यात आले आणि त्याला सात तास मारहाण करण्यात आली. यानंतर जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणाला प्रचंड मारहाण झाली असल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला. तसंच बीफ सूप पिताना एका तरुणाने फेसबुकवर फोटो शेअर केल्याने त्याला मारहणा करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. तसंच शनिवारीच पोलिसांचेही मॉब लिंचिंग होत असल्याची बाब मायावती यांनी अधोरेखित केली. या सगळ्या घटनांबाबत आता ब्रिटनमधील लेबर पार्टीच्या खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. भारतात घडणाऱ्या या घटना लाज आणणाऱ्या आहेत असंही लेबर पार्टीने म्हटलं आहे.