तिहार जेल प्रशासनाने मला एकांतवासात ठेवलं असा आरोप जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने दिल्ली कोर्टात केला आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याने कोर्टात हा आरोप केला आहे. मला ही शिक्षा नेमकी कशासाठी दिली जाते आहे? मला सुरक्षेची गरज आहे मात्र अशी सुरक्षा नको की मला कुठे बाहेरही पडता येणार नाही किंवा कुणाशी बोलताही येणार नाही. ही अशी शिक्षा मला का दिली जाते आहे? असंही उमर खालिदने कोर्टात विचारलं आहे. तसंच मला अनेक दिवसांसाठी एकांतवासात ठेवण्यात आल्याचंही त्याने म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांनी मार्च २०२० मध्ये उमर खालिदच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये चिथावणीखोर भाषण देणं, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याच्या वेळी लोकांना आंदोलनासाठी भडकवणे यासहीत इतरही काही आरोप आहेत. उमर खालिदवर हिंसाचार भडकवण्यासाठी उद्युक्त करण्याचा आणि हिंसा घडवून आणण्यासाठी कट रचल्याचाही आरोप आहे.

कोण आहे उमर खालिद?
उमर खलिदचं कुटुंब ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झालं. उमर खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दू मासिक चालवत. जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. २०१६ मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान आज उमर खालिदला दिल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने तिहार जेल प्रशासनाने एकांतवासात ठेवल्याचा आरोप केला आहे.