कन्हैय्याकुमारला १० हजारांचा दंड

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये अफझल गुरूच्या फाशीविरोधात कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी विद्यापीठाने उमर खलिद याच्यासह इतर दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. तसेच विद्यापीठाने कन्हैय्या कुमारला १० हजारांचा दंड ठोठावला.

उमरला एका सत्रासाठी, मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी आणि अनिर्बन भट्टाचार्यला १५ जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अनिर्बनला पुढील पाच वष्रे विद्यापीठातून कोणताही अभ्यासक्रम शिकता येणार नाही. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह उमर आणि अनिर्बन यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते.

कॅम्पसमध्ये ९ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमाला आक्षेप घेणारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य सौरभ शर्मा याला वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीने दोषी ठरविले आहे. त्याला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पाच सदस्यीय समितीने जेएनयू प्रशासनातील त्रुटीही निदर्शनास आणल्या आहेत. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही.