सौदी अरेबियाच्या आघाडीने येमेनमध्ये हवाई हल्ले सुरूच ठेवले असून त्यात ७६ जण ठार झाले. आता एडन व ताएझ येथे तुंबळ धुमश्चक्री सुरू आहे. दरम्यान येमेन शांतता योजना  इराणने संयुक्त राष्ट्रांना सादर केली असल्याचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांनी सांगितले.
अल अनाद प्रांताचे अधिकारी अबेद्राबो अल मिहवाली यांनी सांगितले की, हवाई हल्ल्यांमध्ये २० बंडखोर ठार झाले असून येमेनच्या हवाई तळावर हल्ले करण्यात आले.
दरम्यान पाश्चिमात्य सैन्य दले मागे घेतल्यानंतर तेथील जिहादींनी भूभाग बळकावण्यात यश मिळवले आहे. एडन येथे २४ तासांत ४० जण हवाई हल्ल्यात ठार झाले आहेत. दक्षिणेकडील दुसरे मोठे शहर असलेल्या दार साद येथे अनेक बंडखोर ठार झाले तर ताएझ या एडनच्या उत्तरेकडील भागात १६ जण ठार झाले ते परागंदा अध्यक्ष अबेद्राबो मन्सूर हादी यांचे समर्थक सैनिक होते. हुथी बंडखोरांनी त्यांच्या तळावर जोरदार हल्ला केला होता. मृतांमध्ये तीन नागरिकांचाही समावेश आहे. काही लोकांच्या घरावर तोफगोळे पडल्याचे वृत्त आहे. पस्तीसव्या ब्रिगेडच्या मुख्यालयावरही हल्ले करण्यात आले.