करोना महामारीविरोधातील अनेक आव्हानांचा सामना करण्यात जगभरातील धर्मिक नेत्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते, असे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केले आहे.

“या वैश्विक आजाराशी लढण्यासाठी आज संपूर्ण जगाला एकत्र येण्याची गरज आहे. अजूनही जग धर्म आणि इतर कारणांनी विभागलं गेलं आहे. अशात जगभरातील धार्मिक नेते विविध धार्मिक समुदायांना एकत्र आणण्यात सक्रिय आणि प्रभावी भूमिका वठवू शकतात,” असे गुटेरेस यांनी शनिवारी करोनासंबंधी संबोधन करताना म्हटले.

धार्मिक नेते करोना महामारीविरोधातील लढाईत लोकांना समाधान देण्याबरोबरच त्यांना या आजाराच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी मदतशील ठरु शकतात, असे गुटेरेस म्हणाले.

धार्मिक गुरु घरगुती हिंसाचार थांबवू शकतात

संयुक्त राष्ट्राचे प्रमुखांनी पुढे म्हटलं की, “करोना महामारीदरम्यान घरगुरती हिंसाचारात धोकादायक पातळीवर वाढ झाली आहे. विश्वव्यापी लॉकडाउनच्या काळात समाजात महिला आणि मुलींवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. त्या हिंसाचाराच्या मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहेत. समाजात असहिष्णूतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे सर्व मानवतेच्या सामान्य सिद्धांतांच्या विरोधात आहे. हे रोखण्यासाठी धार्मिक गुरुंची प्रमुख भूमिका ठरू शकते. आपापल्या समाजातील घरगुती हिंसाचाराला विरोध करताना हे थांबवण्याचे आवाहन आपल्या लोकांना ते करु शकतात. त्यांच्या अशा आवाहनाचा समाजावर जरूर परिणाम होईल, अशी आशाही गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.