करोना व्हायरस विरोधात तुमचा लढा सुरु आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत, असा संदेश संयुक्त राष्ट्राकडून भारताला देण्यात आला आहे. २१ दिवस लॉकडाउन घोषित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटनेने  कौतुक केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्वपूर्ण पाऊल असल्याचे  जागतिक आरोग्य संघटनेने  म्हटले आहे. दररोज करोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, जगभरात आतापर्यंत १८,९१५ नागरिकांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

१६५ देशांमध्ये ४ लाख २२ हजार ९०० जणांना करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया या देशांमध्ये करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारताने या देशांपासून धडा घेऊन केलेल्या उपायोजनांमुळे भारतात रुग्ण संख्येचा आकाडा कमी आहे.

अमेरिकाही जनता कर्फ्यूने भारावली
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, संध्याकाळी पाच वाजता नागरीकांनी टाळया आणि थाळया वाजवून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असे आवाहन केले होते.
या आवाहनाला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद पाहून अमेरिकाही भारावून गेली आहे. अमेरिकेने भारताच्या या जनता कर्फ्यूचे कौतुक केले आहे. खरोखरच हे प्रेरणादायी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून जी सेवा बजावली जातेय, त्याचेही कौतुक केले आहे.