बिहारच्या विधानसभेत जदयू आणि भाजपनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे त्यामुळे विरोधकांना नितीशकुमारविरोधी बोलण्याची आयती संधीच मिळाली आहे. अशा सगळ्या वातावरणात सत्तेत सहभागी झालेल्या भाजपनं उत्तर दिलं नसतं तरच नवल. अनैसर्गिक युती नैसर्गिकरित्या तुटली असं म्हणत उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी महाआघाडी आणि जदयू राजद युतीवर प्रहार केला आहे. तसंच बिहारमध्ये बहुमत सिद्ध झाल्याबद्दल सुशील मोदी यांनी आनंदही व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही लवकरच बसून मंत्रिमंडळाची रचना करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बिहारमध्ये जे काही घडलं ते सगळ्या देशानं पाहिलंच. जदयू-राजद आणि काँग्रेस यांच्यातलं महाभारत फारकत घेण्यावर संपलं आहे. नितीशकुमार महाआघाडीचं मुख्यमंत्रीपद सोडून भाजपशी हात मिळवत पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची किमया साधली आहे. विश्वास असलेल्या सरकारला पक्षाला पाठिंबा द्या अशा आशयाचा व्हीप जदयू आणि भाजपनं जारी केला होता. असाच व्हीप काँग्रेस आणि राजदनंही जारी केला होता. मात्र १३१ आमदारांचा पाठिंबा मिळवत जदयू आणि भाजपच्या युतीनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजद हा बिहार विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे.

राजकारणाचा कधीच काहीही अंदाज बांधता येत नाही हे जे म्हटलं जातं ते बिहारमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यामुळे आणखी स्पष्ट झालं आहे. मात्र नितीशकुमारांवर आता काँग्रेस आणि राजदकडून टीका व्हायला सुरूवात झाली आहे. नितीशकुमार हे बाहेर पडणारच होते असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष यांनी केलं आहे. तर महाआघाडी आणि राजदसोबत राहण्याची नितीशकुमारांची इच्छा नव्हती म्हणून ते बाहेर पडले असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे. मात्र मला कोणीही शिकवू नये असं म्हणत नितीशकुमार यांनी सगळ्या विरोधकांना उत्तर दिलं आहे.

आम्हाला सत्तेचा मेवा खाण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हवी आहे. जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून आम्ही पुन्हा या पदावर बसलो आहोत. स्वार्थ आणि आत्महित साधण्यासाठी आम्ही कधीही राजकारणाचा उपयोग केला नाही असंही उत्तर नितीशकुमार यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un natural alliance died naturally says sushil modi
First published on: 28-07-2017 at 15:35 IST