संयुक्त राष्ट्राने २००८ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याचे प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे अपील फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीला पुलवामा हल्ल्यातील जबाबदार दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्याचे पुन्हा एकदा अपील केले आहे. त्याचवेळी हाफिज सईदचे वृत्त हाती आले आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती.

भारताने हाफिजच्या हालचालीविषयी विस्तृत पुरावे आणि गोपनीय माहिती सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून हे वृत्त समोर आले आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हाफिजचे वकील हैदर रसूल मिर्झाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक हाफिजवर मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ बंदी घातली होती. हाफिजने २०१७ मध्ये या बंदीविरोधात लाहोर येथील लॉ फर्म मिर्झा अँड मिर्झाच्या माध्यमातून अपील दाखल केले होते. तेव्हा तो पाकिस्तानमध्ये नजरकैदेत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राकडून नियुक्त करण्यात आलेले स्वतंत्र लोकपाल डॅनियल फॅसियाती यांनी हाफिजच्या वकिलाला ही माहिती दिली आहे.

हाफिजच्या याचिकेला भारतासह अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही विरोध केला होता. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही याबाबत आक्षेप नोंदवला नव्हता.