05 August 2020

News Flash

काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बंदद्वार बैठक!

काश्मीर प्रश्नावरील चर्चेला दुय्यम स्थान देण्याची फ्रान्सची मागणी आहे.

वॉशिंग्टन : जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत शुक्रवारी बंदद्वार बैठकीत चर्चिला जाणार आहे. अशा बैठकीची चीनने केलेली आग्रही मागणी मान्य झाली आहे.

ही बैठक गुरुवारीच व्हावी, अशी चीनची इच्छा होती. मात्र  पूर्वनियोजित बैठका अधिक असल्याने ही चर्चा शुक्रवारी घेण्याचे ठरविण्यात आले. ही बैठक बंदद्वार असून त्यात पाकिस्तानच्या प्रतिनिधींनाही प्रवेश दिला जाणार नाही. बैठकीतील चर्चेचा तपशील जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा अनुच्छेद ३७० आणि घटनेतील ३५ अ ही तरतूद भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत हा मुद्दा नेला जाईल, असे सांगितले होते. चीनने या प्रश्नी पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेतली होती.

विशेष म्हणजे चीनवगळता सुरक्षा परिषदेतील अन्य चारही स्थायी सदस्यदेशांनी भारताच्या बाजूने मतप्रदर्शन केले आहे. काश्मीरसह भारत आणि पाकिस्तानातील सर्व वादाचे मुद्दे हे केवळ द्विपक्षीय चौकटीतले असून त्यात त्रयस्थ देशांचा हस्तक्षेप नको, अशी ठाम भूमिका भारताने वेळोवेळी मांडली आहे. त्या भूमिकेचे या चारही देशांनी समर्थन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काश्मीरमधील घडामोडी ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नावरील चर्चेला दुय्यम स्थान देण्याची फ्रान्सची मागणी आहे. त्यावरूनही चीन आणि फ्रान्समध्ये मतभेद असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 3:45 am

Web Title: un security council meeting on kashmir issue on closed door zws 70
Next Stories
1 लोकसंख्यावाढ रोखणे गरजेचे!
2 काश्मीरविषयक याचिकांवर आज सुनावणी?
3 जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्याने पाकिस्तानमध्ये ‘काळा दिवस’
Just Now!
X