संयुक्त राष्ट्रे : अमेरिका व तालिबान यांच्यात २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या शांतता करारास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे. या कराराचे स्वागत करून मंजुरी देणारा ठराव करण्यात आला असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शाश्वत शांतता नांदावी व अमेरिकी सैन्यास तेथून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने मंगळवारी या शांतता करारास मान्यता देणारा ठराव मंजूर केला, तो अमेरिकेने मांडला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील हंगामी उप स्थायी प्रतिनिधी चेरिथ नॉर्मन चॅलेट यांनी सांगितले, की अमेरिकेने तालिबानशी वर्षभर राजनैतिक वाटाघाटी केल्या असून आताचा शांतता करार हे त्याचेच फलित आहे. अफगाणिस्तान या संधीचा चांगला  लाभ घेऊन तेथील संघर्ष मिटवेल अशी अमेरिकेला अपेक्षा आहे.

तालिबानने आंतरराष्ट्रीय दहशतवादी  संघटनांशी संबंध तोडावेत व अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्या विरोधात हल्ले करू नयेत असे करारात ठरले आहे. या करारानुसार तालिबानने अफगाण सरकारशी वाटाघाटी करणे अपेक्षित असून त्या  लवकरच सुरू होणार आहेत.

करारानंतर लगेचच तालिबानने हिंसाचार केल्याने या वाटाघाटी लांबणीवर पडल्या होत्या.  ‘दी ग्रुप ऑफ फ्रेंड्स ऑफ विमेन इन अफगाणिस्तान’ या गटाची संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात बैठक झाली. त्यानंतर काही तासातच कराराचे स्वागत  करून मंजुरी देणाऱ्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मतदान झाले.

हिंसाचार कमी झाला तरच तालिबानच्या कैद्यांची सुटका : घनी

काबूल : जर हिंसाचार कमी झाला तरच अफगाणिस्तान सरकार तालिबानच्या पाच हजार कैद्यांची सुटका करण्याची प्रक्रिया या आठवडय़ापासून सुरू करील, असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तालिबान दहशतवादी व अफगाणिस्तान सरकार यांच्यातील वाटाघाटी प्रक्रियेत असलेले अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेने असे म्हटले होते,की अफगाणिस्तानातील दोन तळांवरून त्यांचे सैनिक माघारी जाणार आहेत. दोहा येथे गेल्या महिन्यात अमेरिका व तालिबान यांच्यातील करारात तालिबानच्या कैद्यांची सुटका करण्याचे मान्य करण्यात आले होते. शनिवारी तालिबानच्या १५०० कैद्यांची सुटका करण्यात येणार असून उर्वरित ३५०० कैद्यांची सुटका वाटाघाटी सुरू झाल्यानंतर केली जाईल, असे घनी यांचे प्रवक्ते सेदीक  सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

तालिबान मंगळवारी सरकारशी वाटाघाटी सुरू करणार होते पण १००० कैद्यांना तातडीने सोडले तरच वाटाघाटी सुरू करण्यात येतील अशी भूमिका तालिबानने घेतली होती. घनी यांनी सांगितले, आम्ही आमची भूमिका सौम्य करणार नाही. सुरुवातीला १५०० कैद्यांची आम्ही सुटका करू व त्यानंतर वाटाघाटीची प्रगती पाहून दोन आठवडय़ात पाचशे कैदी सोडण्यात येतील.