बलात्कार प्रकरणात २० वर्षांचा तुरुंगवास भोगत असलेल्या राम रहिमकडे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले आहे. राम रहिमसोबतच त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत इन्साकडेही संयुक्त राष्ट्र संघाने शौचालय दिनाला समर्थन देण्यासाठी आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून १९ नोव्हेंबरला ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जाणार आहे. @UN_Water ट्विटर हँडलकडून एक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून ‘जागतिक शौचालय दिना’चे समर्थन करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राकडून राम रहिम आणि हनीप्रीतला करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये राम रहिम आणि हनीप्रीतला टॅग करण्यात आले आहे. ‘प्रिय हनीप्रीत इन्सा आणि राम रहिम, तुम्ही जागतिक शौचालय दिनाला पाठिंबा द्याल, अशी आम्हाला आशा आहे,’ असे संयुक्त राष्ट्र संघाने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आलेल्या या ट्विटबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला राम रहिम सध्या रोहतकमधील तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महिन्याभरापूर्वी २० वर्षांची शिक्षा सुनावली. राम रहिमला न्यायालयाने २५ ऑगस्टला दोषी ठरवले. यावेळी हनीप्रीत त्याच्यासोबत होती. राम रहिमला दोषी ठरवताच हरयाणातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. सात राज्यांचे पोलीस तिचा शोध घेत होते. अखेर काल (मंगळवारी) हनीप्रीतला अटक करण्यात पोलिसांना यश आले.