गुजरातच्या उना येथे गोरक्षक पीडित दलितांच्या एका समुहाने रविवारी हिंदू धर्माचा त्याग केला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या उना दलित अत्याचार प्रकरणातील एका कुटुंबासोबत जवळपास ३०० ते ३५० दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पीडित कुटुंबातील सदस्य बालू सरवैया यांनी समाजातील इतर लोकांचं स्वागत केलं. तर, बालू यांचा मुलगा रमेश याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबियाशिवाय गावातील ५० घरांमधील लोक आणि संपूर्ण गुजरातमधून जवळपास ३०० दलितांनी हिंदू-दलित असल्यामुळे होत असलेल्या अत्याचाराला वैतागून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असं सांगितलं.

पीडित कुटुंबातील वशराम सरवैया म्हणाले, आमच्यावरील अत्याचाराला दीड वर्ष झालं पण अजूनही न्याय मिळाला नाही, आमच्यासोबत सातत्याने भेदभाव केला जात आहे. त्यामुळे आम्ही आज बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पीडित कुटुंबाने आणि इतर दलितांनी धर्मांतरादरम्यान शपथ घेतली की, ते केवळ बौद्ध धर्माला मानतील आणि हिंदू देवी-देवतांवर विश्वास ठेवणार नाही. हा दुसरा जन्म असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. याशिवाय, ‘आम्हाला हिंदूच मानले जात नव्हते, मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता. याच कारणामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी जुलै २०१६ मध्ये काही दलित तरुणांना गोरक्षकांनी अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर गुजरातमध्ये व्यापक दलित आंदोलनही सुरू झाले होते. उनामधील घटनेमुळे आजही दलितांच्या मनात मोठा राग आहे.