करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वसामान्यांना रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बेड मिळाल्यानंतर ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर या सुविधा मिळतील की नाही याची खात्री नाही अशी स्थिती अनेक राज्यांमध्ये आहे. उत्तर प्रदेशातही करोना रुग्ण वाढत असून व्हेंटिलेटरची मागणी वाढत आहे. व्हेंटिलेटरसोबत असणारा बेड मिळवणं रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक लढाईच झाली. फक्त सर्वसामान्यच नाही तर कित्येक डॉक्टरांनाही या परिस्थितील सामोरं जावं लागत आहे.

८५ वर्षीय वरिष्ठ डॉक्टर जे के मिश्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रयागराज येथील स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात काम करत होते. करोना झाल्यानंतर ते याच रुग्णालयात दाखल झाले होते. पण जेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती तेव्हा मात्र त्यांना मिळाला नाही आणि पत्नीच्या डोळ्यांसमोर त्यांनी जीव सोडला. इतकी वर्ष ज्या रुग्णालयात त्यांनी सेवा दिली त्याच रुग्णालयात सुविधांअभावी मृत्यू होण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.

आणखी वाचा- “आमचं कर्तव्य नाही असं म्हणू शकत नाही,” दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं

जे के मिश्रा यांना १३ एप्रिलला करोनाची लक्षणं जाणवत होती. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. तीन दिवसांनी त्यांनी एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अजून खालावली. त्यांना व्हेंटिलेटर सुविधा असणाऱ्या बेडवर शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण शहरात एकाही रुग्णालयात सुविधा नव्हती.

आणखी वाचा- Corona: भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट; साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण तर २८१२ रुग्णांचा मृत्यू

रुग्णालयात एकूण १०० व्हेंटिलेटर होते. पण मिश्रा यांच्या आधी दाखल झालेल्या रुग्णांना ते देण्यात आले होते असं रुग्णालयाने सांगितलं. कोणत्याही रुग्णालयाचा व्हेंटिलेटर काढून मिश्रा यांना देणं शक्य नव्हतं असंही त्यांनी सांगितलं आहे. करोना फटका बसलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सध्याच्या घडीला २ लाख ९७ हजार करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.