17 September 2019

News Flash

लडाखमधील घुसखोरीबाबत माहिती नाही; चीनचा साळसूदपणाचा आव

चीनकडून बैठकीचे निमंत्रण नाकारण्यात आल्याची २००५ नंतरची पहिलीच वेळ

Ladakh Pangong lake : सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून गेला महिनाभर भारत व चीनमध्ये वाद सुरू असतानाच आता चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी घुसखोरी केल्याचा दावा बुधवारी चीनकडून फेटाळण्यात आला. पँगाँग सरोवर परिसरात मंगळवारी भारत आणि चिनी लष्कराच्या गस्ती पथकाच्या नौका आमनेसामने आल्या होत्या. यावेळी चीनच्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्क भारतीय सेनादलांनी तो वेळीच उधळून लावला. मात्र चिनी सैनिकांना अटकाव करताना दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीत काही सैनिक जखमी झाले. काही वेळाने चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतले होते. तत्त्पूर्वी चीनी सैन्याने भारताकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात आलेल्या औपचारिक बैठकीचे निमंत्रणही नाकारले होते. चीनकडून बैठकीचे निमंत्रण नाकारण्यात आल्याची २००५ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. याविषयी चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांना विचारण्यात आले असता त्यांनी मला काहीही माहिती नसल्याचे म्हटले. चिनी सैन्याच्या तुकड्या नेहमीच नियंत्रण रेषेच्या परिसरात गस्त घालत असतात. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सीमारेषेवर शांतता आणि जैसे थे परिस्थिती कायम राहिल, यासाठी चीन कटिबद्ध आहे. पण त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेले करार आणि नियंत्रण रेषेवरील स्थिती याला पूरक निर्णय भारताने घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून गेला महिनाभर भारत व चीनमध्ये वाद सुरू असतानाच आता चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराचा ४५ किमी लांबीचा भाग भारतात तर ९० किमी लांबीचा भाग चीनच्या ताब्यात आहे.

या सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह या ठिकाणी चिनी सैन्याने स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी ६ ते ९ वाजण्याच्या दरम्यान दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वेळा भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसत असताना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना अडवले. मात्र त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याला भारतीय जवानांनीही तसेच उत्तर दिले. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक किरकोळ जखमी झाले. सुमारे अर्ध्या तासात परिस्थिती आटोक्यात येऊन दोन्ही बाजूंकडून एकमेकांना फलक दाखवण्यात आले व दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या जागेवर परतले.

First Published on August 16, 2017 2:14 pm

Web Title: unaware of reports of pla soldiers entering ladakh pangong lake china