|पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू होणारा एक छुपा भुयारी मार्ग भारताच्या सीमा सुरक्षा दलाला आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आढळून आला आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील बेंगालाड परिसरात दिसून आलेल्या या छुप्या मार्गाचा वापर भारतात दहशतवादी घुसविणे तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी केला जात असावा, असे सीमा सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.

जम्मूत भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या कुंपणापासून काही अंतरावर  या मार्गासाठी खणलेली जागा दिसून आली. अशा छुप्या बांधकामांचा छडा लावण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने मोहीम हाती घेतली आहे.

हे भुयार तीन ते चार फूट व्यासाचे असून त्याच्या माध्यमातून दहशतवादी भारतात पाठवणे व अमली पदार्थाची तस्करी करणे शक्य होते. भूयार खणण्याचे हे काम अपूर्णावस्थेत असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.

सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी घुसखोरी विरोधी यंत्रणा सज्ज आहे किंवा नाही याची पाहणी करून सीमेवरील छुपी बांधकामे शोधून काढावीत, असे आदेश दिले आहेत. हे भुयार भारतीय बाजूच्या कुंपणापासून पन्नास मीटर अंतरावर आहे. सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकास गुरुवारी जम्मूतील सांबा क्षेत्रात गलार भागामध्ये ते दिसून आले. या भूमिगत मार्गाच्या तोंडावर वाळूने भरलेल्या ८-१० प्लास्टिक गोण्या लावलेल्या होत्या. त्या गोण्यांवर पाकिस्तानी खुणा आहेत.

सीमा सुरक्षा दलाचे जम्मूतील महानिरीक्षक एन. एस. जामवाल यांनी घटनास्थळी भेट दिली. भुयाराच्या तोंडावरील हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्यांवर कराची व शाकारगड येथील कारखान्यांचे शिक्के होते. पाकिस्तानच्या गुलझार या चौकीपासून हे भूयार ७०० मीटर  अंतरावर आहे. सीमा सुरक्षा दलाने सांगितले की, घुसखोरीच्या कामासाठीच त्याचा वापर होणार असण्याची शक्यता आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,  सीमा सुरक्षा दलाने  घुसखोरीविरोधात सातत्याने बहुस्तरीय मोहीम राबवली आहे. पाकिस्तानी सीमेवरील खेडय़ात दहशतवादी नेहमीच घुसखोरीसाठी तयार असतात. पण अनेकदा  त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

महानिरीक्षक जामवाल यांनी सांगितले की, आताचे भुयार पाहिले तर ते पाकिस्तानचेच कृत्य आहे यात  शंका नाही. त्याची पाकिस्तानला माहिती असणार हेही उघड आहे. वाळूच्या गोण्यांवरील तारखा बघता हे भुयार अलीकडेच खणण्यात आले असावे. त्याची चौकशी सुरू आहे असे . अलीकडेच  पाच सशस्त्र घुसखोर पंजाब सीमेवर मारले गेले होते. घुसखोरीसाठी खणलेल्या भुयारांचा शोध घेण्यासाठी आता रडारचाही वापर केला जाणार आहे. यापूर्वीही जम्मू सीमेवर सीमा सुरक्षा दलाला अशी भुयारे सापडली होती.

जमीन खचू लागल्याने संशय

सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका  शेतक ऱ्याच्या शेतात पावसाने जमीन खचू लागल्याने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आला. त्यानंतर यंत्राच्या मदतीने हे भुयार उघडे करण्यात आले. ते १७० मीटर लांबीचे आहे. २० फूट खोलीच्या या भुयाराची बांधणी चालू होती. हे भुयार प्रारंभी २५ फूट खोल असून ते सीमा सुरक्षा दलाच्या व्हेलबॅक या चौकीपासून जवळच आहे.

‘हिजबुल’चे ३ दहशतवादी ठार; एक जवानही शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे (एचएम) तीन दहशतवादी ठार झाले, तर लष्करातील एक जवान शहीद झाला, असे पोलिसांनी सांगितले. झादुरा गावात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांत आदिल हाफीज, अर्षद अहमद दार आणि रौफ अहमद मिर यांचा समावेश असून  ते पुलवामातील रहिवासी आहेत. या दहशतवाद्यांचा अनेक  हल्ल्यांमध्ये सहभाग होता.