आयर्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना दिसत आहे. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र सादर करत हा महत्त्वाचा पुरावा असल्याचा दावा केला होता. सोबतच सहमतीने शारिरीक संबंध ठेवण्यात आल्याचाही दावा केला. यानंतर महिलांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर #ThisIsNotConsent (ही सहमती नाही) हॅशटॅग करत आपल्या अंतर्वस्त्राचा फोटो ट्विट करत आहेत. आयर्लंडच्या खासदार रुथ कॉपिंगर तर यांनी थेट संसदेतच अंतर्वस्त्र दाखवत आपला विरोध दर्शवला.

17 वर्षीय तरुणीच्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने 6 नोव्हेंबरला 27 वर्षीय आरोपीची सुटका केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र महत्त्वाचा पुरावा असल्याचा दावा करत न्यायालयात सादर केलं. पीडित तरुणी आरोपीकडे आकर्षित होती. हा बलात्कार नसून सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध होते असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. आरोपीची सुटका करण्यात आल्यापासून आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसत आहे.

पीडित तरुणीलाच दोषी ठरवण्याच्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी आयर्लंडच्या महिला खासदार रुथ कॉपिंगर आपलं अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचल्या. सुनावणीदरम्यान पीडित तरुणीचं अंतर्वस्त्र दाखवण्यावर त्यांनी कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला. या कृत्यामुळे त्या तरुणीला किती लज्जास्पद वाटलं असेल याचा विचार केला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. भर न्यायालयात अंतर्वस्त्र दाखवलं तेव्हा तिच्या काय भावना असतील हा विचार करुनच संताप येतो असंही त्या म्हणाल्या.

आयर्लंडमध्ये न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी रॅली काढत निषेध नोंदवला जात आहे. सोशल मीडियावरही लोक आपल्या प्रतीक्रिया नोंदवत आहेत.