अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीच्या गुंडाला मुंबई पोलिसांनी अटक केली असून या गुंडाच्या चौकशीतून डी कंपनीबाबतची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. दाऊद इब्राहिमच्या वाढत्या वयामुळे सध्या डी कंपनीची सूत्रे दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमकडे असल्याचा संशय मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दाऊद टोळीच्या संपर्कात राहून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या हरिष ग्यानचंदानी या अंगडीयाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह रामदास रहाणे या गुंडाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. अनीस इब्राहिमने रामदासला चार ते पाच व्यावसायिकांची यादी दिली होती. त्यांच्या हत्येचा कट रहाणेने रचला होता. यासाठी ग्यानचंदानीने रहाणेला अनीसच्या सांगण्यावरुन साडे तीन लाख रुपये दिले होते. मुंबईतील ख्यातनाम हॉटेलच्या मालकाचा या यादीत समावेश होता. रहाणे हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर येत आहे.

दाऊदचा मुलगा मोईन हा मौलाना झाला असून दाऊदसारखा तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेला नाही. त्यामुळे टोळीची सूत्रे छोटा शकीलकडे जातील, अशी शक्यता होती. मात्र, रहाणेची कसून चौकशी केल्यानंतर अनीस इब्राहिमच्या इशाऱ्यावर ‘डी कंपनी’ काम करत असल्याचे समोर आले आहे. छोटा शकील हा दाऊदचा उजवा हात समजला जात होता. पण सध्या छोटा शकील ऐवजी अनीस इब्राहिमकडे टोळीची सूत्रे असल्याचा अंदाज मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.

छोटा शकील आणि दाऊदमध्ये पटत नसल्याचेही चर्चा होती. छोटा शकील ‘डी कंपनी’तून बाहेर पडल्याचीही चर्चा होती. मात्र, दाऊदच्या टोळीतील गुंडाना झालेली अटक आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार छोटा शकील अजूनही दाऊदसोबत आहे. फक्त त्याच्याऐवजी अनीसचे टोळीतील वर्चस्व वाढले आहे.