News Flash

दाऊदला मोठा धक्का; युएई सरकारकडून १५ हजार कोटींची संपत्ती जप्त

या आर्थिक कोंडीमुळे दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) सरकारच्या कारवाईमुळे मोठा धक्का बसला. ‘झी न्यूज’च्या वृत्तानुसार युएई सरकारने जगातील मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांपैकी एक असणाऱ्या दाऊदची तब्बल १५ हजार कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. या आर्थिक कोंडीमुळे दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदने यूएईमध्ये मॉल्स, हॉटेल्स आणि कंपन्यांच्या समभागांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली आहे. दुबईमध्येही दाऊदची संपत्ती मोठ्याप्रमाणावर असून या कारवाईदरम्यान तीदेखील जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये भारताने पुरविलेल्या कागदपत्रांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या युएई दौऱ्याच्यावेळी भारताकडून युएई सरकारला दाऊदविषयीची डोझियर्स कागदपत्रे देण्यात आली होती. या माहितीच्याआधारे युएई सरकारने गेल्या काही दिवसांपासून दाऊदच्या संपत्तीची चौकशी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात भारताने दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरविणारी यूएईतील संपत्ती जप्त करण्याची मागणी केली होती. भारताने पुरविलेल्या या डोझियर्समध्ये दुबईत दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम चालवत असलेल्या गोल्डन बॉक्स या कंपनीसह अनेक कंपन्यांची माहिती होती. युएई सरकारच्या आजच्या कारवाईनंतर या सर्व कंपन्या आणि संपत्तीवर टाच आली आहे. दाऊदने दुबईशिवाय मोरक्को, स्पेन, युएई, सिंगापूर, थायलंड, सायप्रस, तुर्की, भारत , पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये गुंतवणूक केल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाऊदला पुन्हा भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. मुंबई बॉम्बस्फोटांसह विविध गुन्हेगारी कारवायांप्रकरणी वाँटेड असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. दाऊद नेमका कुठे आहे याविषयी अधिकृत माहिती नाही. मात्र दाऊदला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा कवच दिल्याचे समोर आले आहे. दाऊदला पुन्हा भारतात परत आणण्याचा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र अद्याप यात यश आलेले नाही. आता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा दाऊदच्या भारतवापसीचे विधान केले आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनीही दाऊदवर प्रतिक्रिया दिली होती. मुसक्या बांधून दाऊदला देशात आणण्याची गोपीनाथ मुंडे यांची घोषणा १९९५च्या दरम्यान फार गाजली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 10:45 pm

Web Title: underworld don dawood ibrahims assets worth rs 15000 cr seized in uae ajit dowal plays major role
Next Stories
1 वेळ पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू, लष्करप्रमुख रावत यांचा इशारा
2 घरगुती सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास पाच रूपयांची सूट!
3 उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी अखिलेश यांना पसंती, मुलायमसिंहांनाही टाकले मागे
Just Now!
X