देशात अनलॉक – २ सुरू झाल्याबरोबरच बेरोजगारीच्या दरात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर मे महिन्यात तो २३.५० टक्के इतका होता. आकडेवारीनुसार, जूनमध्ये ३७.३ कोटी लोकांकडे रोजगार होता. तर ४६.१ टक्के लोक हे रोजगाराच्या शोधात असल्याची माहिती सीएमआयच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

तर जूनमधील रोजगाराचा दर ३५.८ टक्के होता. दरम्यान, २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर एप्रिलमध्ये देशात बेरोजगारीचा दर २३.५२ टक्क्यांवर गेला होता.. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाउनमुळे अर्थचक्र थांबल्यानं बेरोजगारी दर २३.४८ टक्के राहिली. तर दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर विक्रमी २७.१ टक्क्यांवर पोहोचला. सीएमआयच्या मते एप्रिलमध्ये सुमारे १२.२ दशलक्ष लोकांनी आपला रोजगार गमावला होता.

दोन वर्षात हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर

पर्यटन, प्रवास आणि हॉटेल क्षेत्रावर करोनाच्या संकटाचा सर्वाधित परिणाम जाणवला आहे. दरम्यान, हॉटेलमधील प्रत्येक रिकाम्या खोलींसाठी आकारले जाणारे दर गेल्यावर्षीच्या दराच्या बरोबरीत येण्यासाठी सुमारे १३ ते २४ महिने लागतील, असा अंदाज ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म ‘जेएलएल’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीने यासाठी देशातील प्रमुख १४ हॉटेल ऑपरेटिंग कंपन्यांशी चर्चा केली. सर्वेक्षणानुसार केवळ २० टक्के हॉटेल चालकांना पुढील ६ ते १२ महिन्यांत त्यांच्या हॉटेलचे उत्पन्न २०१९ च्या पातळीवर जाईल असं वाटत आहे. तर ६० टक्के लोकांचा असा विश्वास आहे की २०१९ च्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांना किमान १३ ते २४ महिने लागतील. लक्झरी किंवा महागड्या हॉटेल्सबाबत सर्वेक्षणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या उत्पन्नाचे दर २०१९ च्या पातळीवर परत येण्याची शक्यता कमी असू शकते. तसंच यास दोन वर्षांहून अधिक कालावधी लागू शकेल, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.