बेंगळुरु : कर्नाटकचे सांस्कृतिक व पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची नुकतीच भाजपच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले.

चिकमंगळुरु येथून ते चार वेळा आमदार झाले असून शनिवारी त्यांनी येडीयुरप्पा मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. २६ सप्टेंबरला त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली असून ते सोमवारी विमानाने दिल्लीला जाणार आहेत. केंद्रातील भाजप नेत्यांची ते भेट घेतील. रवी हे मंत्रिमंडळातील पद सोडण्याची अपेक्षा नव्हती.

सी. टी. रवी यांनी गुरुवारी  चिकमंगळुरु येथे सांगितले होते, की मी राजीनामा पत्र तयार ठेवले आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात बदल करणार असतानाच रवी यांचा राजीनामा आला आहे.

कर्नाटकात मंत्र्यांची कमाल मर्यादा ३४ आहे पण सध्या तेथे २८ मंत्री आहेत. मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यात इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना मोठय़ा आशा आहेत.

रवी यांनी ‘मनकुथीमना कागा’ ही कन्नड लेखक डी. व्ही गुंडाप्पा यांची ओळ  ट्विटर संदेशात वापरली आहे. एखादी व्यक्ती मरते तेव्हा काही थांबत नसते. काळ हे त्यावर औषध असते. ज्या मातीत आपल्याला पुरले जाते किंवा जाळले जाते त्यातून नंतर झाडे उगवतात, पृथ्वी माता पुन्हा गर्भवती होते व नव्या जीवनाचा आरंभ होतो. निसर्ग हा नेहमी मनकुथीमना म्हणजे नवनिर्मितीच्या अवस्थेत असतो, असे या संदेशात त्यांनी पुढे म्हटले आहे.