देशभरात कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर भाजपवर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे. कथित गोरक्षकांचा भाजपशी संबंध जोडणे गैर आहे. पक्ष त्यांना कधीही पाठिशी घालणार नाही, असे ते म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजप सरकारचे धोरण आहे. त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. हे धोरण राबवताना अल्पसंख्याकांविरोधात कोणताही भेदभाव केला जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली तरी त्याचा भाजपशी संबंध जोडला जातो. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी भाजपचा कोणताही संबंध नसतो. त्याचे पक्ष समर्थन करत नाही, असेही ते म्हणाले. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणे चुकीचे आहे. खरे तर अशा घटना घडू नयेत, असे गडकरी म्हणाले. गोरक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या लोकांचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही. आम्ही त्यांचे समर्थन करणारच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी निषेध केला आहे. मग कथित गोरक्षकांचा भाजपशी संबंध का जोडला जातो, असा सवालही त्यांनी केला. अशा लोकांचा भाजपशी संबंध जोडून भाजप सरकार अल्पसंख्याक आणि दलितविरोधी असल्याचे सांगितले जाते. या माध्यमातून भाजप सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप, संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषद अशा कोणत्याही घटनांचे कधीच समर्थन करणार नाही, असे सांगून समाजवादी पक्ष आणि काँग्रेस राजवटीच्या काळात अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. सरकार कोणत्याही जातीविरोधात नाही. भेदभाव करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी जोडण्या देण्यात आल्या. त्या केवळ हिंदूनाच दिल्या नाहीत तर मुस्लिम कुटुंबीयांनाही दिल्या गेल्या, असे उदाहरणही त्यांनी दिले. गरिबीविरोधात आमचा लढा आहे, तो कोणत्याही जातीविरोधात नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.