काश्मीरला विशेषाधइकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानला सर्वच स्तरावर निराशा हाती लागली आहे. चीन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाने पाकिस्तानची कोणतीही बाब गंभीररित्या घेतलेली नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनीदेखील अन्य देशांची भारताला साथ असल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खोटे दावे आता हास्याचा विषय बनत चालले आहेत. काश्मीर मुद्द्यावर मानवाधिकार आयोगातील कथितरित्या 58 देशांनी समर्थन दिल्याने धन्यवाद करणारे ट्विट त्यांनी केलं होतं. परंतु यामध्ये केवळ 47 सदस्य देशच आहेत.

काश्मीरमध्ये भारत सैन्याचा वापर थांबवावा, काश्मीरी जनतेच्या नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि काश्मीरमधून निर्बंध हटवावे, यासाठी 10 सप्टेंबर रोजी मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानची साथ दिलेल्या 58 देशांची मी प्रशंसा करतो, अशा आशयाचं ट्विट इम्रान खान यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक युझर्सनी त्यांना ट्रोल केलं. यामध्ये पाकिस्तानी युझर्सचाही समावेश होता. मानवाधिकार परिषदेत 47 सदस्य देश आहेत, तर एकूण 58 देशांचं समर्थन कसं मिळालं? असा सवाल अनेक युझर्सनी केला.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनीदेखील इम्रान खान यांची फिरकी घेतली आहे. संयुक्त राष्ट्राचा मानवाधिकार आयोग 47 सदस्य देशांचा मिळून तयार झाला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर एका युझरने 58 देशांमध्ये बलुचिस्तान, सिंधुदेश आणि पस्तुनिस्तानही सामिल आहे का असा सवाल केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानची फिरकी घेतली. पाकिस्तानला 58 देशांचे समर्थन मिळाल्याचा सवाल पत्रकाराने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना केला. यावर उत्तर देताना मानवाधिकार आयोगात 47 सदस्य देश असताना त्यांना 60 देशांचं समर्थन कसं मिळालं हे पाकिस्तानच सांगू शकतो असं ते म्हणाले. तसंच त्यांना समर्थन मिळालं असतं तर सर्वांना त्याची माहिती मिळाली असती. त्या ठिकाणी कोणतीही गोपनीय बैठक होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. UNHRC मध्ये भारत पाकिस्तानसह 47 सदस्य देश आहेत. पाकिस्तानच्या दाव्याने ठरवण्यात आलेली सदस्यसंख्याही पार केली आहे. सध्या पाकिस्तान हताश झाला आहे आणि याच कारणामुळे ते खोटे दावे करत असल्याचेही त्यांनी म्हटलं.