जगभरातील करोनाचं संकट अजूनही ओसरलेलं नाही. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून, याचा मोठा परिणाम मुलांवर झाल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. करोनाचं संकट पुढच्या वर्षात कायम राहणार असल्याचं चित्र असून, करोनाचा प्रभाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे.

युनिसेफने १४० देशांमध्ये पाहणी केली. करोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला असून, जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचंही या पाहणीतून समोर आलं आहे. १४० देशांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीच्या अहवालातून सध्याच्या पिढीसमोर उद्भवलेल्या तीन प्रकारचे धोके दिसून आले आहेत. या धोक्यांमध्ये करोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरिबी आणि विषमतेचा समावेश करण्यात आला आहे. वाढत्या गरिबी ही मुलांसमोरील सर्वात मोठं संकट असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफचं दिला आहे.

जगातील एकतृतीयांश देशामधील आरोग्य सेवांमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाची भीतीमुळे ही घट झाली असून, नियमित लसीकरण, बाह्यरुग्णांची केली जाणारी देखभाल, लहान मुलांना होणारा संसर्ग, गर्भवती महिलांसाठीची आरोग्य सेवा यावर याचा परिणाम झाला असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. ६५ देशांमध्ये घरोघरी जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटींमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.