भारतातील मुलांमध्ये कु पोषणाची समस्या तीव्र असून त्यामुळे उंची व वजन कमी असणे या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी मुलांच्या पोषण आहारात ‘उत्तपम’ व  ‘मोड आलेल्या डाळींचा पराठा’ असे पदार्थ समाविष्ट करण्याची सूचना युनिसेफने केली असून त्यामुळे कमी वजन, लठ्ठपणा, रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या तक्रारी दूर होणार आहेत.

या पदार्थासाठी वीस रुपयांहून कमी खर्च येतो. याबाबत एक आहार पदार्थ पुस्तिका र्सवकष राष्ट्रीय पोषण सर्वेक्षण २०१६-१८ या अहवालातील निष्कर्ष पाहून तयार करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार पाच वर्षांखालील ३५ टक्के मुलांची वाढ खुंटलेली असून त्यातील १७ टक्के मुलांचे वजन उंचीच्या तुलनेत कमी आहे. ३३ टक्के मुले सर्वच निकषांनी कमी वजनाची आहेत.  रक्तक्षयाचे प्रमाण मुलींमध्ये ४० टक्के तर मुलग्यांमध्ये १८ टक्के आहे. बालपणात लठ्ठपणाची समस्याही आहे. शाळकरी मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण दहा टक्के आहे.

मुलांना द्यावयाच्या ताज्या अन्नपदार्थाबाबत २८ पानांची  पुस्तिका युनिसेफकडून  तयार करण्यात आली असून त्यात प्रत्येक पदार्थ कसा तयार करायचा याची पाककृती दिली आहे. शहरातही मुलांसाठीही ही पुस्तिका उपयोगाची आहे. युनिसेफच्या प्रमुख हेनरिटा फोर यांनी म्हटले आहे,की ‘या पुस्तिकेतून आहारातील पदार्थाचे पोषणमूल्यही दिले आहे. माणसाच्या आयुष्यात पोषणाच्या दृष्टीने दोन टप्पे असतात. त्यात पहिला टप्पा मूल जन्मल्यानंतरच्या हजार दिवसांचा आहे. त्या काळात मातांचा आहारही चांगला असला पाहिजे. दुसरा टप्पा हा किशोरवयीन अवस्थेतील आहे, त्यातही पोषणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

पुस्तिकेत नेमके काय

कमी वजन असलेल्या मुलांसाठी बटाटय़ाचा पराठा, पनीर काठीरोल व सागो कटलेट या पदार्थाची पाककृती दिली आहे. लठ्ठपणा असलेल्या मुलांसाठी मोड आलेल्या डाळीचे पराठे, पोहे, भाज्यांचा उपमा यांची शिफारस केली आहे.  उष्मांकासह प्रथिने, कबरेदके, अन्नचोथा, क जीवनसत्त्व, कॅल्शियमची मात्रा या सगळ्यांचे प्रमाण सदर पाककृतींमध्ये किती प्रमाणात आहे याची माहितीही दिली आहे.