समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी गुरूवारी भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंत संसदेत शुक्रवारी जोरादार गदारोळ झाला. भाजपासह अन्य पक्षांकडूनही आझम खान यांचा तीव्र निषेध केला गेला. तर, संसदेतील महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आझम खान यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या महिला खासदारांमध्ये रमा देवी यांच्यासह केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, निर्मला सीतारमण, सुप्रिया सुळे, नवनीत राणा, मिमी चक्रवर्ती, अनुप्रिया पटेल आदींचा समावेश आहे.

याबाबत भाजपा खासदार रमा देवी यांनी म्हटले की, आझम खान यांनी कधीच महिलांचा मान ठेवला नाही. आम्हाला माहित आहे की, त्यांनी जया प्रदा यांच्याबद्दल देखील काय म्हटले होते. त्यामुळे त्यांना लोकसभेत राहण्याचा काहीच अधिकार नाही. मी अध्यक्षांकडे आझम खान यांना बाहेर काढण्याची मागणी करणार आहे. आझम खान यांनी माफी मागायला हवी.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले की, माझ्या सात वर्षांच्या संसदीय कार्यकाळात कोणत्याही पुरूषाने अशाप्रकारची वर्तवणूक केली नव्हती. हे प्रकरण केवळ महिलांशीच निगडीत नाही तर, संपूर्ण समजाशी जुडलेले आहे. याबाबत कठोर कारवाईकरून नक्कीच एक कडक संदेश दिला जावा. काल या सभागृहाची मान शरमेने झुकली आणि हे संपूर्ण देशाने पाहिले. महिला कोणत्याही पक्षाची असो, कोणालाही तिचा अपमान करण्याचा अधिकार नाही. आझम खान यांनी निघून जाऊन केवळ नाटक केल आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण  म्हणाल्या की, सपा खासदार आझम खान यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. कोणालाही महिलेचा अपमान करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या वक्तव्याबद्दल  आझम खान यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी देखील कठोर शब्दात आझम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले की,  जो काही प्रकार घडला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. कोणीही संसदेत उभा राहून महिलेविरोधात चुकीचे वक्तव्य करू शकत नाही. सभागृहाने याबद्दल एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

शुक्रवारी संसदेचे कामकाज सुरू होताच आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून  संसदेत गोंधळ सुरू झाला. भाजपासह काँग्रस, टीएमसी, एनसीपी, जेडीयू व अन्य पक्षांनी देखील लोकसभा अध्यक्षांकडे आझम खान यांच्या बडतर्फीची मागणी केली.