06 August 2020

News Flash

Union Budget 2019 : आरोग्यम् धनसंपदा: ६२६५९ कोटी

सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात आरोग्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळते.

| July 6, 2019 05:48 am

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्यासाठी ६४०० कोटींची तरतूद

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ६२६५९.१२ कोटी रुपयांची तरतूद केली. गेल्या दोन वर्षांतील तरतुदींपेक्षा ती जास्त आहे.

सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पात आरोग्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळते. त्यांनी या क्षेत्रासाठी केलेली तरतूद २०१८-१९मधील तरतुदीपेक्षा १९ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ५२ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

अर्थमंत्र्यांनी निव्वळ आरोग्यावर ६०,९०८.२२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर ६,४०० कोटी रुपये आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेवर खर्च करण्याचे प्रस्तावित केले आहे. या दोन्ही योजना महत्त्वाच्या सरकारी योजना आहेत.

आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून प्रत्येक लाभार्थीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील आजाराच्या उपचारांचा वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च देण्यात येतो. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी २४९.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी १,३४९.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य अभियानाअंतर्गत २०२२ पर्यंत दीड लाख आरोग्य उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आणि वृद्धत्वातील आजारांवर उपचार करता येतील इतपत ही आरोग्य केंद्रे साधनसामुग्रीने सज्ज असतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानावरील तरतूद ३०,१२९.६१ कोटींवरून ३२,९९५ कोटींवर नेली आहे, तर राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेवरील तरतूद मात्र १,८४४ कोटींवरून १५६ कोटींवर आणली आहे.

राष्ट्रीय एड्स आणि गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी २५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. गेल्या आर्थिक वर्षांतील तरतुदीत यंदा ४०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही तरतूद २,१०० कोटी होती.  एआयआयएमएस (एम्स)साठी  ३,५९९.६५ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. ती २०१८-१९ या वर्षांसाठी ३,०१८ कोटी एवढी होती.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमावरील तरतूद १० कोटींनी कमी करून ती ४० कोटींवर आणण्यात आली आहे. त्याच वेळी राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमावरील निधीची तरतूद १७५ कोटींवरून २९५ कोटींवर नेण्यात आली आहे.

कर्करोग, हृदयरोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी आदी गंभीर आजारांवरील खर्चाची तरतूद २०० कोटींनी कमी करून ती ५५० कोटी करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांत रूपांतर करण्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालये (पदवी) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य संस्थांना एक हजार ३६१ कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारच्या निमवैद्यकीय संस्था आणि निमवैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी २० कोटी देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या तरतुदी

* राष्ट्रीय आरोग्य अभियानावरील तरतूद ३०,१२९.६१ कोटींवरून ३२,९९५ कोटींवर

* राष्ट्रीय एड्स आणि गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी २५०० कोटी.

* एआयआयएमएस (एम्स)साठी  ३,५९९.६५ कोटी.

* राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमासाठी २९५ कोटी.

* गंभीरावस्थेतील आजारांवरील तरतूद २०० कोटींनी कमी.

* परिचारिका सेवेला अद्ययावत आणि मजबूत करण्यासाठी ६४ कोटी.

* औषधनिर्माण महाविद्यालयांसाठी पाच कोटी.

* जिल्हा रुग्णालये आणि राज्य सरकारी वैद्यकीय (पदव्युत्तर) महाविद्यालयांसाठी ८०० कोटी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2019 1:53 am

Web Title: union budget 2019 government allocate 6400 crore for ayushman bharat scheme zws 70
Next Stories
1 Union Budget 2019 : जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था उभारण्यासाठी ४०० कोटी
2 Union Budget 2019 : आर्थिक बदलाची मोठी क्षमता
3 Union Budget 2019 : महिला, गरिबांचे कढ; पण भांडवलदार-व्यापाऱ्यांना परतफेड!
Just Now!
X