संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला ३१ जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासंबंधी कॅबिनेटच्या संसदीय समितीची याप्रकरणी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.

३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीला अरुण जेटलींकडून अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्रितपणे सादर केला जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल कॅबिनेटच्या संसदीय समितीच्या बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार उपस्थित होते. सर्व योजनांसाठी योग्य वेळेत निधीचा पुरवठा व्हावा, यासाठी यंदा अर्थसंकल्प लवकर सादर केला जाणार आहे. सर्व योजनांना एक एप्रिलपासून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्प लवकर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्रितपणे सादर केला जाणार आहे. गेल्या ९२ वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प वेगवेगळे सादर केले जात आहेत. मात्र या वर्षापासून ही परंपरा मोदी सरकारने मोडीत काढली आहे.