पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून गुरूवारी शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटपही जाहीर करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जी आहे अर्थसंकल्पाची. मोदींच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करतील.

देशाच्या अर्थमंत्रीपदाचा मान इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सीतारमन यांना मिळाला आहे. १९७० ते १९७१ या कालावाधीत इंदिरा गांधी यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच एका महिलेला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून स्थान मिळालं आहे. निर्मला सीतारमन या बजेटमध्ये काय काय समोर आणणार? शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी कोणतं धोरण समोर आणणार? गरीबांसाठी कोणती योजना आणणार ? या सगळ्याची उत्तरं आता ५ जुलै रोजी मिळणार आहेत.

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १७ जून पासून संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. तर देशाचा अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर केला जाईल असे निर्णय या बैठकीत पार पडले. लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी १९ जूनला मतदान घेतलं जाईल असंही या बैठकीत ठरलं आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत भाजपाने पुन्हा एकदा देशाची सत्ता काबीज केली. २०१४ नंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

त्याचपाठोपाठ टीम मोदीही नव्याने ठरली आहे. नव्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना गृहमंत्री म्हणून स्थान देण्यात आलं आहे तर निर्मला सीतारमन या केंद्रीय अर्थमंत्री झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्या त्यांची जबाबदारी कशी पार पाडणार हे पहाणे निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे.