करोनाशी लढण्यासाठी खासदारांची ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तूर्तास १२ महिन्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय झाला असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या देशावर आलेलं करोनाचं संकट हे खूप मोठं आहे. त्यामुळे या संकटाशी सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. याच विषयावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

देशभरातली करोनाग्रस्तांची संख्या ४ हजाराच्या वर गेली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यानंतर काय केलं जाणार? यासंदर्भात प्रश्न विचारला असता प्रकाश जावडेकर यांनी यावरही उत्तर दिलं. प्रकाश जावडेकर म्हणाले की जगभरातल्या करोनाच्या फैलावाचे मिनिटामिनिटाचे अपडेट्स आपण घेत आहोत. भारतात काय उपाय योजायचे हे त्या त्या वेळी ठरवलं जाईल. तूर्तास लॉकडाउननंतर काय निर्णय घ्यायचा याची चर्चा बैठकीत झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.