सुषमा स्वराज यांचा समावेश नाही; संयुक्त जनता दलाचा सहभागास नकार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली! त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयनेची शपथ दिली.

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर या दोघांना थेट कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. शहा यांच्या समावेशाची चर्चा सुरू होतीच, पण जयशंकर यांची निवड हा सुखद धक्का ठरला आहे. अनुभवाच्या जोडीला नव्या चेहऱ्यांचीही निवड मंत्रिमंडळात झाली आहे. पक्षनेतृत्वावर दाखवलेली निष्ठा आणि बलाढय़ विरोधकांवर मिळवलेली बाजी या कसोटींवर यशस्वी ठरलेल्या भाजपच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

मोदींच्या मंत्रिमंळात ५७ मंत्र्यांचा समावेश झाला असला तरी अजून खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम आहे.

अमित शहा हे मोदींच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठत्वाच्या निकषावर क्रमांक तीनचे प्रभावी मंत्री असतील. राजनाथ सिंह यांनी मोदीनंतर शपथ घेतल्याने ते मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री असतील. राजनाथ यांनी शपथ घेतल्याने ते लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे. अमित शहा यांच्याकडे गृह वा अर्थ खाते दिले जाण्याची शक्यता आहे.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांना पुन्हा संधी दिला जाण्याची चर्चा दिवसभर सुरू होती पण, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. मोदींच्या अत्यंत विश्वासातील माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना थेट कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे जयशंकर हे नवे परराष्ट्रमंत्री असू शकतील. जयशंकर हे अमेरिका आणि चीन या महत्त्वाच्या देशांमध्ये राजनैतिक अधिकारी होते. भारत-अमेरिका यांच्यात झालेल्या अणुकरारावेळी जयशंकर परराष्ट्र सचिव होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा मोदींच्या परराष्ट्र धोरणासाठी मोठा उपयोग होणार आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार देणारे अरुण जेटली यांची गैरहजेरी मात्र जाणवत होती. पियुष गोयल यांच्याकडे आता कोणते खाते दिले जाते यावर चर्चा सुरू आहे. उर्वरित कॅबिनेट मंत्र्यांमध्ये जुनेच चेहरे अधिक आहेत. गेल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल तसेच, गजेंद्र सिंह शेखावत यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे.

नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पियुष गोयल, स्मृति इराणी, प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी पुन्हा संधी देण्यात आली  आहे.

घटक पक्षातील शिवसेना, अकाली दल, लोकजनशक्ती आदी पक्षांच्या प्रत्येकी एका सदस्याला मंत्रीपद देण्यात आले आहे.

..पण पाठिंबा कायम

मंत्रिपदाची संख्या आणि मंत्र्यांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसल्याने नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ऐनवेळी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला. असे असले तरी आपण ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तच असल्याचेही या पक्षाने स्पष्ट केले आहे.

टाळ्यांचा गजर

शपथविधी समारंभात उपस्थितांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त गजर तीन नेत्यांसाठी केला. पहिले होते अमित शहा. भाजपच्या विजयात यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसरे नेते होते नितीन गडकरी. पण सर्वाधिक कडकडाट झाला तो स्मृती इराणी यांच्यासाठी. अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून त्यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले आहे.

वगळलेले चेहरे..

जुन्या मंत्रिमंडळातील सुरेश प्रभू,   सुभाष भामरे, हंसराज अहिर, राज्यवर्धन  सिंह राठोड तसेच, जे. पी नड्डा ही महत्त्वाची नावे वगळण्यात आली आहेत. अमित शहा मंत्री झाल्याने भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नड्डा यांच्याकडे दिली जाऊ शकते. मेनका गांधी हंगामी लोकसभा अध्यक्षाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.