पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही व्यक्त केला. मोदी यांनी घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून चूक झाली. चूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यात दुरुस्ती केली. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल माफी मागायलाही त्या विसरल्या नाही.

देशात करोनाच्या संकटानं अडचणींमध्ये मोठी भर घातली आहे. एकीकडं आरोग्य क्षेत्रातील समस्यांना तोंड देत असताना आर्थिक संकटही लॉकडाउनमुळं गंभीर होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं बेरोजगारीबरोबर इतर आर्थिक आव्हान उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून केली जात होती.

अखेर केंद्र सरकारनं अर्थजगतासह देशातील विविध घटकांना दिलासा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून याची माहिती दिली. मात्र, ट्विट करताना २० लाख कोटी रुपयांऐवजी त्यांच्याकडून २० लाख असं लिहिलं गेलं. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्त केली. “टाईप करताना चूक झाली असून, २० लाख ऐवजी २० लाख कोटी असं वाचावं,” असं म्हणत त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

“करोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी रोजगारनिर्मिती करणाऱ्या विविध उद्योगांसाठी केंद्राने आर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासंदर्भात गेल्या आठवड्यात निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी चर्चाही केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असं पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर स्पष्ट केले होतं.