जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. त्यातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. तसंच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीनं घेतला होता. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

२२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमधअये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येतं. तसंच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

वर्षात दोन वेळा बैठक

हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.